असा महाराष्ट्र याआधी कधीच नव्हता; राज ठाकरेंचे शरद पवारांवर गंभीर आरोप!

नागपूर : विधानसभा निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भाचा दौरा करत आहेत. सध्या राज ठाकरे नागपूरमध्ये असून जिल्ह्यातील १२ विधानसभा जागेचा ते आढावा घेणार आहेत. आज नागपूरमध्ये राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचेही दौरे योजण्यात आले आहेत. तर मनसेदेखील मोर्चेबांधणी करण्यात गुंतली आहे. प्रत्येक पक्ष आपल्या बालेकिल्ल्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. तर इतर मतदारसंघातही राजकीय समीकरण जुळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका!

फोडाफोडीचे राजकारण, जातीयवाद या सर्व गोष्टींना कारणीभूत शरद पवार आहेत. या गोष्टींची महाराष्ट्रात पहिली सुरुवात पवारांनी केली. पुलोद स्थापन झाले तेव्हापासून पाहिले तर १९७८ ला सरकार बनवले, त्यानंतर १९९१ साली शिवसेनेचे आमदार फोडले. गणेश नाईक, नारायण राणे गेले तेव्हाच महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीला सुरुवात झाली आणि हे सगळे राजकारण शरद पवारांनी महाराष्ट्रात सुरू केले. दरम्यान, जातीचे विषयदेखील त्यांनीच कालवले. १९९९ साली जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला त्या अगोदरचा महाराष्ट्र आणि त्यानंतरचा महाराष्ट्र तुम्ही बघा. कधी महापुरुषांची विभागणी जातीत झाली नव्हती. संताची ओळख आडनावांनी केली जात नव्हती. या सर्व गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या, असा महाराष्ट्र याआधी कधीच नव्हता असे सांगत राज ठाकरेंनी शरद पवारांना टार्गेट केले.

लोकसभेला जे घडले ते विधानसभेला घडेल असे समजू नका!

लोकसभेला महाविकास आघाडीला जे मतदान झाले, त्यात मोदी आणि शाह यांच्या विरोधात एकगठ्ठा मतदान होते. त्यात भाजपच्या काही उमेदवारांनी संविधान बदलले जाणार अशा आशयाचे विधान केले आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर दलित समाजाने पण मोदी आणि शाह यांच्या विरोधात मतदान केले होते. परंतु लोकसभेला जे घडले ते आता विधानसभेला घडेल असे समजू नका. कारण विधानसभेला मतदार योग्य उत्तर देणार हे नक्की, असे राज ठाकरे यांनी म्हणाले आहेत.