ठाणे : बदलापुरमधील शाळेत चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. साधारण आठवडाभराने हा प्रकार उजेडात आला असून यानंतर पोलीस, प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तसेच, आरोपींवर कडक कारवाई केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू असे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, राज्यातील शाळांमध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शालेय शिक्षण विभागाने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आता पोस्को अंतर्गत ई बॉक्स संकल्पना राबवण्यात येत असून यासोबतच शाळेमध्ये तक्रार पेटीही ठेवायला हवी, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर ( Deepak kesarkar) यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश काय?
शाळेत अशा घटना घडल्यास संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. आरोपीवर कडक शासन करा, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी चर्चा देखील केली. तसेच, सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत की नाही ते तपासण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश काय?
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत.
बदलापूरमध्ये आंदोलन!
या घटनेचे पडसाद बदलापुरात उमटताना दिसत आहेत. ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेसमोर शेकडो पालकांचा जत्था लोटला आणि जोरदार आंदोलन करण्यात आले. तसेच, बदलापूर रेल्वे स्थानकात लोकांनी रेल्वे रुळावर आंदोलन करण्यात सुरुवात केली असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही असे सांगितले. आज बदलापुरात कडकडीत बंद पाळला जात आहे. रिक्षा, दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सध्या बदलापुरात तणाव वाढताना दिसत आहे.