मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लांबणीवर पडल्याचे चित्र आहे. मात्र राजकीय पक्षांकडून निवडणुकीचे मैदान तयार करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत; परंतु राज्यातील सत्तेत असलेल्या नेत्यांमध्ये दुरावा असल्याचे दिसून येत आहे. अशातच, अजित पवार यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा घणाघात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी महायुतीतील विषयावर भाष्य केले असून महायुतीतल्या तीन पक्षांमध्ये एकवाक्यता राहिलेली नाही असे सांगितले आहे. तसेच, महायुतीत जागावाटपावेळी मारामाऱ्या होतील, असा दावा देखील त्यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra fadanvis) आणि अजित पवार एकत्र असल्याचे दाखवतात पण ते एकत्र नाहीत. अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जर अजित पवारांना बाहेर काढले नाही तर त्यांनाच जागा कमी मिळतील, त्यामुळे अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच, मुंबई-गोवा महामार्ग यावरून टीका करत संजय राऊत म्हणाले, एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारहाण करण्याची भाषा करतो म्हणजे प्रकरण टोकाला गेल्याचे दिसते. रस्त्यांची कामे घेणाऱ्या ठेकेदारांकडून महाराष्ट्रात लूटमार सुरु आहे. पाटबंधारे खाते, रस्ते विकास खाते हे सर्व खाते शिंदे गटासाठी एटीएम मशीनसारखी झाली आहे. या सरकारला फक्त पैसे पाहिजेत; परंतु खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. लोकांचे मृत्यू होत आहेत याकडे मात्र सरकारचे लक्षच नाही.
राऊतांचे फडणवीसांना आव्हान काय?
देवेंद्र फडणवीसांना माझा प्रश्न आहे की, नवाब मलिक विधानसभेत सरकारच्या बाजूच्या बाकावर बसले होते. तेव्हा त्यांनी सरकारी बाकावर बसणे कसे योग्य नाही? याकडे लक्ष वेधत नितीमत्तेचा पुळका आणत एक पत्र लिहीले होते. आता फडणवीस ते पत्र मागे घेणार का? जर पत्र मागे घेणार नसतील तर मलिकांवरील सर्व आरोप खोटे असल्याचेे त्यांनी मान्य करावे. त्यांनी सु़डानेच मलिकांवर कारवाई केल्याचे मान्य करणार का? असे खुले आव्हान राऊतांनी फडणवीसांना केले आहे.