नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातून (Nashik City) विश्रांती घेतलेल्या पावसाने आज दुपारच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. अवघ्या तासभर आलेल्या या पावसामुळे शहरातील ठिकठिकाणचे रस्ते तुंबल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे पुनरागमन झाल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाचे थैमान पाहायला मिळाले आहे.
नाशिकमध्ये दुपारच्या सुमारास केवळ अर्ध्या तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तसेच, या पावसामुळे नागरिकांना गाडी चालवतांना चांगलीच कसरत करावी लागली. नाशिक येथील काही भागांत पावसामुळे जागोजागी रस्ते तुंबल्याचे पाहायला मिळाले. तसेच या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील झाली असून यावर नागरिकांकडून संतापही व्यक्त करण्यात आला.
या जिल्ह्यातही मुसळधार पाऊस!
सिंधुदुर्गात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी भागात पावसाचा जोर कायम आहे. यवतमाळ जिल्ह्यातही मागील दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात उखाडा जाणवत होता; परंतु आज विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने या जिल्ह्यातही हजेरी लावली आणि यामध्ये यवतमाळच्या दारव्हा महामार्गावर बोरीअरब येथील अडान नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने दुचाकी वाहून गेल्याची घटना घडली.
हवामान विभागाची माहिती काय?
हवामान विभागाने (IMD) राज्यात पुन्हा पुढील आठवड्यापासून पावसाचे पुनरागमन होणार असल्याचे म्हटले आहे. तसेच राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांत वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.