डिसेंबरमध्ये निवडणूक झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू? काय म्हणाले आयुक्त?

मुंबई : आता राज्यातील मतदान कधी? याबाबत चर्चा रंगली आहे. दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक घेण्याचे संकेत निवडणूक आयोगाने दिले असले तरी राज्यामध्ये विद्यमान विधानसभेची मुदत संपल्यानंतरच म्हणजेच डिसेंबरच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. तसेच ही निवडणूक लांबणीवर पडण्यामागे शिंदे सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजना कनेक्शनचीही चर्चा आहे. विशेषतः डिसेंबरमध्ये निवडणूक झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही वेळ येऊ शकते.

माहितीनुसार लाडकी बहिण योजनेचे आणखी २ ते ३ हप्ते जास्तीत जास्त महिलांच्या खात्यावर जमा व्हावे, यातून महिलांचे मतदान आपल्याला व्हावे यासाठी निवडणूक लांबणीवर गेल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महाराष्ट्राच्या प्रश्नावर काय म्हणाले आयुक्त?

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीची तारीख अद्यापही जाहीर झालेली नाही. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ २७ नोव्हेंबरला संपत आहे, तरीही निवडणूक का जाहीर केली जात नाही, असे राजीव कुमार यांना विचारण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक सोबत झाली होती. हरियाणाची मुदत ३ नोव्हेंबर होती तर महाराष्ट्राची २७ नोव्हेंबर. त्यावेळी जम्मू काश्मीरचा मुद्दा नव्हता. मात्र यावेळी पाच निवडणुकांचा मुद्दा आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गरज पडली तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल असे संकेत दिले आहेत. कोणत्याही राज्यामधील विधानसभेची मुदत संपल्यानंतर सहा महिन्यांमध्ये निवडणूक घेण्याची मूभा निवडणूक आयोगाला असते. त्यामुळेच विद्यमान विधानसभा २७ नोव्हेंबरला बरखास्त झाली आणि निवडणूक डिसेंबर मध्ये होणार असेल तर मधल्या कालावधीमध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते अशी शक्यता आहे.

कसा आहे दोन राज्यातील निवडणूक कार्यक्रम!

पत्रकार परिषदेत केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी, महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तारखा जम्मू-काश्मीरमधील मतदान पूर्ण झाल्यावरच जाहीर केल्या जातील, असे स्पष्ट केले. यात जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात २४, दुसऱ्या टप्प्यात २७ आणि तिसऱ्या टप्प्यात ४० मतदारसंघात मतदान पार पडेल. पहिल्या टप्प्यातील मतदान १८ सप्टेंबर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान २९ सप्टेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान १ ऑक्टोबरला होईल. तर जम्मू काश्मीर विधानसभेचा निकाल ४ ऑक्टोबरला जाहीर होणार, म्हणजेच ४ ऑक्टोबरच्या मतमोजणीनंतर आठवडाभराचा अवधी तरी घोषणेसाठी दिला जाईल. निवडणुकांच्या घोषणेनंतर ४५ दिवसांचा कालावधी मिळतो. त्यामुळे ऑक्टोबरच्या अखेरच्या टप्प्यात आचारसंहिता लागू होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.