मुंबई : महाराष्ट्रातही सर्वत्र स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करण्यात आला आहे. मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिंदे यांनी सर्व घटकांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकासाला चालना देण्याचे काम सुरु आहे, असे प्रतिपादन केले.
दरम्यान, यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, मुख्य सचिव सुजाता सैनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव यांच्यासह सैन्य दलाचे अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक आणि इतर विभागांचे अधिकारी–कर्मचारी उपस्थित होते.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने भरीव कामगिरी केली आहे. तसेच, त्यांनी विदेशी गुंतवणूक, समाजातील दुर्बल, गोरगरीबांसाठी आखलेल्या नाविन्यपूर्ण योजना या सर्व माध्यमातून नागरिकांप्रती असणारी बांधीलकी दाखवून दिली. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवून जगातली तिसरी अर्थव्यवस्था होण्यासाठी आगेकूच सुरु आहे. त्यामध्ये आपल्या राज्याचा वाटा मोठा असणार आहे. राज्याची वाटचाल त्यादिशेने सुरु असल्याची माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली.
राज्यात गुंतवणुकीचा वेग वाढला!
राज्यातील गुंतवणूकदार, उद्योजक किंवा सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम राज्य शासनाने केले. तसेच, कृषि, शिक्षण, ऊर्जा, निर्मिती, माहिती तंत्रज्ञान, बांधकाम, पर्यटन, आरोग्य सुविधा, कौशल्य विकास, पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा या क्षेत्रांमध्ये आपण आमूलाग्र क्रांती आणत आहोत. राज्यात १५ दशलक्ष रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट्य आपण ठेवले आहे. राज्याची लॉजिस्टिक पॉलिसी जाहीर करण्यात आली असून येत्या पाच वर्षात ३० हजार कोटींचा महसूल राज्य शासनाला मिळणार आहे. गुंतवणूकदरांचा विश्वास वाढल्याने राज्यात गुंतवणुकीचा वेग वाढला आहे. गेल्या दोन वर्षात ५ लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी करार झाले आहेत. परकीय गुंतवणुकीत आपण देशात प्रथम आहोत. त्या माध्यमातून अडीच लाख रोजगार निर्मिती आपण केली आहे. देशाच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा १४ टक्के आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.