मुंबई : विधानसभा निवडणुकांची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, तरीदेखील सर्वच पक्षांनी आपापल्या परीने विधानसभेसाठी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. अशातच बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीत वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणूक लढवणार आहेत.
फेसबुकवर पोस्ट करत स्वतः संजय पांडे यांनी वर्सोवातून विधानसभा निवडणूक (Versova Assembly Election 2024) लढवणार असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, उमेदवारीबाबत घोषणा करत त्यांनी माझ्यासोबत कोणताही पक्ष नाही, असे संगितले. तसेच, काल (रविवारी) संजय पांडे यांनी वर्सोवाच्या झुलेलाल मंदिरात नतमस्तक होत प्रचाराला सुरूवात देखील केलेली आहे.
फेसबुक पोस्ट चर्चेत!
फेसबुक पोस्ट करत संजय पांडे म्हणाले, प्रिय वर्सोवा मतदारांनो तुमचा आवाज महत्त्वाचा आहे. वर्सोव्याला बदल आणि नव्या नेतृत्वाची गरज आहे. तसेच, मुंबईतील माजी पोलीस आयुक्त म्हणून मला माझ्या भूमिकेसह सरकारी सेवेतील ३५ वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे मला कारभारातील पारदर्शकता, प्रतिसाद आणि सहानुभूती याचे महत्त्व समजते. दरम्यान, मी तुमच्या गरजांना प्राधान्य देण्याचे वचन देतो. मी तुमच्यासाठी खरोखर कार्य करणार असून शासन देखील प्रदान करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. वर्सोव्यासाठी एक उज्वल आणि अधिक उत्तरदायी भविष्य घडवू. तुम्हाला प्रथम स्थान देणाऱ्या नेतृत्वाला मत द्या, अश्या प्रकारची फेसबुक पोस्ट त्यांनी केलेली आहे.
फोन टॅपिंग प्रकरणी अटक!
संजय पांडे हे अनेक वेळा वादात सापडले आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज कर्मचार्यांशी संबंधित फोन टॅपिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना दिल्ली उच्च न्यायालयातून जामीन मिळाला. ते १९८६ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी कानपूरमधून शिक्षण घेतले आहे. त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्तपद भूषवले आहे.