नवी दिल्ली : मोदी सरकारने जालना ते जळगाव अशा १७४ किमी लांबीच्या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे. हा रेल्वेमार्ग मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पासाठी ७ हजार १०५ कोटी रुपयांच्या निधीची तरतुद करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जळगाव-जालना रेल्वेमार्गासह इतर ८ मोठ्या रेल्वे मार्गांना देखील मंजुरी देण्यात आली आहे.
दरम्यान, या रेल्वे मार्गावर रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा तयार केला जाणार आहे. या बोगद्याची लांबी २३.५ किलोमीटर एवढी राहणार आहे. यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. येत्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. या रेल्वेमार्गाने मराठवाड्यातील उद्योजकांना फायदा मिळणार असून जहाजांमध्ये माल नेण्यासाठी या रेल्वेचा उपयोग होऊ शकणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील जालना, औरंगाबाद व जळगाव ही जिल्हे रेल्वेने जोडले जाणार आहेत.
काय म्हणाल्या मंत्री अश्विनी वैष्णव?
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने आठ नव्या रेल्वे मार्गांना मंजुरी दिली. महाराष्ट्रातील जालना ते जळगाव या नव्या रेल्वे मार्गाच्या निर्मितीमुळे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेण्यांना जाणे सोयीचे होणार आहे. या रेल्वे प्रकल्पामुळे ६० लाख लोकांना रोजगार मिळणार असून त्यासाठी ९३६ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. तसेच ५४ कोटी किलोग्रॅम कार्बन उत्सर्जनात घट होणार असून, यामुळे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातशी संपर्क सोयीचा होणार आहे. याशिवाय ओडिशा, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबईसाठी २० हजार कोटी!
मुंबईमधील रेल्वेच्या विकासासाठी २० हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार, अशी देखील माहिती वैष्णव यांनी दिली. मुंबईत दररोज ७५ लाख लोक लोकलने प्रवास करतात. पश्चिम व मध्य रेल्वेमार्ग अधिक प्रभावी करण्यासाठी रेल्वे १० प्रकल्प पूर्ण करणार आहे. देशातील १२८ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण अमृत रेल्वे योजनेअंतर्गत केले जाणार आहे.