मुंबई : बांगलादेशात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरक्षण विरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. त्यामुळे, या बांगलादेशमध्ये अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आता चिंता निर्माण झाली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी बांगलादेशच्या काही भागात शिकणाऱ्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आणि तत्काळ कारवाईच्या गरजेवर भर दिला आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यांनी मायदेशात परत यावे यासाठी, आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. या आव्हानात्मक काळात राज्य सरकार बाधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांसमवेत सक्षमपणे उभे आहे, असे ते म्हणाले.
सुरक्षेसाठी नेमक्या उपाययोजना काय?
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी राज्य सरकारने परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. बांगलादेशमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळवून आणि त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सध्या बांगलादेशात असलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची यादी संकलित करून परराष्ट्र मंत्रालयाला उपलब्ध करून देण्यात आली असून, आता या विद्यार्थ्यांशी त्वरित संपर्क साधण्यास आणि त्यांना मदत उपलब्ध करून देण्यास राज्य सरकार सक्षम असणार. दरम्यान, तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवणे आणि केंद्रीय अधिकारी आणि प्रभावित कुटुंबांशी संपर्क ठेवण्यासाठी राज्य शासनामार्फत एक पथकही स्थापन करण्यात आले आहे.