तब्बल ११ सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; २५० हून अधिक विद्यार्थी रुग्णालयात दाखल!

पालघर : गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडीसह विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना दिलेल्या आहारामध्ये किडे, मुंग्या, आळ्या आढळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. अशातच आता पालघरमधील एका आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर मध्ये ११ सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये २५० पेक्षा जास्त विद्यार्थी हॉस्पिटल मध्ये दाखल आहेत.

आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या कांबळगाव येथील सेंट्रल किचन मधून हा भोजन पुरवठा करण्यात येतो. हे सेंट्रल किचन राज्य सरकार कडून चालवले जाते. सोमवारी रात्रीच्या जेवणासाठी दुधी भोपळ्याची भाजी होती. या भाजीमधून ही विषबाधा झाली असल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येत आहे.

विषबाधा कशी झाली?

आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थी आश्रमशाळेतील रुमवर गेले. मात्र, आज सकाळी काही विद्यार्थ्यांना मळमळ होऊ लागली. तर अनेक विद्यार्थिनींना उलट्या होऊ लागल्या. सुरुवातीला २८ विद्यार्थ्यांना त्रास सुरू झाल्याने उपचारासाठी त्यांना रात्री अडीच वाजता कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहीवेळाने बाकीच्या विद्यार्थ्यांनाही मळमळ उलटी असा त्रास सुरू झाल्याने वानगाव ग्रामीण रुग्णालयात १६ विद्यार्थ्यांना तर ऐने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि त्यानंतर उपचारादरम्यान यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले.