नाशिक : नाशिक जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढलंय. गेल्या ४८ तासांपासून नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून जनजीवन विस्कळीत झालंय. गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या मंदिरांना पुराचा फटका बसलाय. पुराच्या पाण्यामुळे, रामकुंडातील मंदिरे पुराच्या पाण्याखाली गेली असून, दुतोंड्या मारुतीच्या छातीएवढे पुराचे पाणी आल्याने, प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
एक तरुण गेला वाहून!
नाशिकच्या रामकुंड परिसरातील पुरात योगेश पवार नावाचा २९ वर्षीय तरुण वाहून गेला. रामकुंड परिसरात तो कालसर्प योग पूजेसाठी आला होता. गोदावरी नदीत पूजन करताना पाय घसरून नदीत पडून तो वाहून गेला. प्रशासनाकडून त्याचा शोध, सध्या सुरुच आहे.
गोदावरी नदी दुथडी भरून!
नाशिक जिल्ह्यातील गोदावरीची पूरस्थिती कायम असून. येथील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेले आहे. गोदा काठावरील इतर मंदिरांना पाण्याने वेढा घातलाय. गंगापूर धरणातून वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावारीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्याला यलो अर्लट!
आज (५ ऑगस्ट) नाशिक जिल्ह्यात पाऊस बरसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. तसेच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. तर सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने ग्रीन अलर्ट दिला असल्याचे समजते.