शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारकडून ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत! नेमकी किती रुपयांची मदत?

मुंबई : राज्यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे फार नुकसान झालेत. त्यामुळे, झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाले असून नुकसानीपोटी बाधितांना ५९६ कोटी २१ लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती पुनर्वसन मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी दिली. तसेच, यात नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांना वितरीत करण्यास राज्य सरकारच्या वतीने मंजूरी देण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती मदत?

नाशिक विभागात ७३ हजार ५६७ शेतकऱ्यांच्या ३७ हजार ४२२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, महसूल विभागाच्या यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणानुसार इथे झालेल्या नुकसानीपोटी १०८ कोटी २१ लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे समजते.

अमरावती जिह्यातील शेतकऱ्यांना किती मदत?

अमरावती विभागातील २१ हजार ३६२ शेतकऱ्यांचे १ लाख ३८ हजार २५३ हेक्टरवर नुकसान असून, इथे झालेल्या नुकसानीपोटी ३८२ कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली जाणार असल्याचे समजते.

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती मदत?

नागपूर विभागातील ३ लाख ५४ हजार ७५६ शेतकऱ्यांच्या २ लाख १७ हजार ६९० हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले असून, त्यांना १०० कोटी रुपयांची भरपाई दिली जाणार असल्याचे समजते.

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती मदत?

पुणे विभागात २ हजार २९७ शेतकऱ्यांचे १६५७ हेक्टरवर नुकसान झाले असून त्यांना ५ कोटी ८३ लाखांची मदत दिली जाणार असल्याचे समजते.

काय म्हणाले मंत्री अनिल पाटील?

ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असून, याबाबतचा महसूल आणि वन विभागाचा शासन निर्णय २ ऑगस्ट रोजी घेण्यात आला. तसेच, केंद्र सरकारने विहित केलेल्या १२ नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण आणि आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, या पावसामुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत देण्यात येईल, असे ते म्हणाले. या निधी वाटपास राज्य सरकारने मंजूरी दिली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.