पावसाळ्यात होऊ शकतो इन्फेक्शनचा धोका! बघा लक्षणे काय?

पावसाळ्यात लोकांना आरोग्याच्या अनेक तक्रारींचा सामना करावा लागतो. पावसामुळे व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, खोकला तापाच्या साथी येतात. यासोबतच पावसामुळे पोटदुखीचीही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. तसेच, पावसाळ्याच्या दिवसांत दूषित पाणी व खाद्यपदार्थांमुळे होणारे आजार वाढणे स्वाभाविक आहे आणि या समस्या देशातील बहुतांश भागात आहे.

पावसाळ्यात होणारे पोटातील इन्फेक्शन जरी सामान्य असले तरी त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण ते खराब पाणी आणि अस्वच्छ अन्नामुळे होत असून ही समस्या कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकते. विशेषत: या ऋतूत मुलांची खूप काळजी घ्या.

काय आहेत इन्फेक्शनची लक्षणे?

पोटात जरी इन्फेक्शन झाले तरी त्याची लक्षणे लगेच दिसून येतात. जसे की, उलट्या, ताप, पोटदुखी किंवा मळमळ होणे यासोबतच अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागते. ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते अशा लोकांना लवकर पोटात इन्फेक्शन होत असते. बरेच लोक याचा संबंध इन्फ्लूएंझाशी जोडतात. पण ते यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. या आजाराचा परिणाम रुग्णाच्या आतड्यांवर जास्त होतो.

इन्फेक्शन होण्याची कारणे काय?

  • खराब झालेले अन्न खाल्ल्यामुळे पोटात इन्फेक्शन होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
  • दूषित पाणी प्यायल्याने देखील पोटात इन्फेक्शन होऊ शकते.
  • स्ट्रीट फूड आणि अस्वच्छता हेही एक महत्त्वाचे कारण आहे.
  • रस्त्यावरील अन्न खाणे देखील शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.
  • जर एखाद्याला हा फ्लू झाला असेल आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या संपर्कात आलात तर तुम्हालाही तो त्रास होण्याची शक्यता वाढते.

इन्फेक्शन होण्यापासून कसे बचाव करू शकतो?

पावसाळ्यात केवळ उकळलेले पाणी प्या, कारण या ऋतुमध्ये जंतूंचा प्रसार झपाट्याने होतो. त्यामुळे पाणी पूर्णपणे उकळल्यानंतरच प्या. यामुळे पाण्यात असलेले जंतू मरतात. यासोबतच, पोटातील संसर्ग टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे जेवणापूर्वी आणि जेवणानंतर हात स्वच्छ करा. अन्न झाकून ठेवा. जर काही कारणास्तव बाहेर खात असाल तर ते चांगले शिजवलेले, उकडलेले किंवा गरम असावे हे लक्षात ठेवा. तसेच, पावसाळ्यात चिरलेली फळे, चटणी, कोशिंबीर, चिरलेला कांदा, पाणी-पुरी इत्यादींचे सेवन टाळावे. शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका.

टीप : कुठलाही उपाय डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय करू नये.