खुशखबर! आता शेतकऱ्यांसाठी होणार कर्जमाफीची घोषणा? कोणाला होणार फायदा?

मुंबई : आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्य सरकारने घोषणांची आणि योजनांची खैरात सुरू केल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लाडका भाऊ योजना, 3 मोफत सिलेंडर, जेष्ठ नागरिक मोफत तीर्थयात्रा योजना यासारख्या लोकप्रिय योजनांची घोषणा यापूर्वीच सरकारने केली आहे. आता शेतकऱ्यांना देखील आकृष्ठ करणाऱ्यासाठी कर्जमाफीची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देवगिरीवर बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक आयोजित करत बैठकीत शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विषय मार्गी लावण्यासाठी निर्णय घ्यावा, यावर चर्चा झाली. या बैठकीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी आदिवासी विकास विभागामार्फत, आदिवासी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आदिवासी विकास संस्था तसेच इतरही शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती तत्काळ उपलब्ध करण्याचे आदेश सहकार संचालक पुणे यांना दिले.

आदिवासी सोसायट्यांना लाभ मिळणार?

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जवळपास ९३८ आदिवासी सोसाट्यांमध्ये शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी एक मोठी घोषणा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार असून याकरिता वित्त विभागाकडून हालचाली देखील सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही याबद्दल सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

केंद्र सरकारची घेणार मदत

केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार काही वाटा टाकून ३ लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शकते आणि याबाबतची माहिती सरकार गोळा देखील करत असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले होते. तसेच, राज्य सरकारकडून सध्या विविध योजनांविषयी घोषणा करणे अद्यापही सुरूच आहे. आधी लाडकी बहीण तर नंतर लाडका भाऊ योजनेबाबत त्यांनी घोषणा केली. आता राज्य सरकार शेतकरी कर्जमाफीबद्दल कधी घोषणा करणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.