राज्यातील महिलांसाठी राज्य सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात महत्वकांक्षी योजनेची घोषणा केली. राज्यातील 21 ते 65 वर्षातील महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना लागू केली आहे. 31 ऑगस्टपर्यंत या योजनेत नोंदणी करता येणार आहे. योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना कागदपत्रांची पुर्तता करणेही गरजेचे आहे. तसेच अर्ज भरताना काळजी घेणेही महत्त्वाचे आहे.
अर्ज कुठे करायचा?
राज्यातील रहिवासी असलेल्या 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. योजनेचा अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन करता येणार आहे. भरलेला अर्ज आपल्याला अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक यांच्याकडून ऑफलाइन पद्धतीने देऊ शकता. तर ऑनलाइन पद्धतीने जवळच्या अधिकृत सीएससी केंद्रावरून अर्ज करू शकता.
अर्ज कसा भरायचा?
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज 12 कॉलमध्ये आहे. त्यातील सर्वच कॉलम भरणे आवश्यक आहे. सुरूवातीला महिलेचे संपूर्ण नाव, लग्नापूर्वीचे नाव आणि लग्नानंतरचे नाव भरायचे आहे. त्यानंतर जन्मतारीख व अर्जदाराचा संपूर्ण पत्ता भरायचा आहे. नंतर जन्माचे ठिकाण, जिल्हा, गाव, ग्रामपंचाय\नगरपंचायत\नगरपालिका, महानगरपालिका आणि पिनकोड लिहायचा आहे. यानंतर मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत आहात का, असेल तर मानधन किती असा कॉलम भरायचा आहे. शिवाय वैवाहिक स्थिती आणि बँकेचा संपूर्ण तपशील टाकायचा आहे. महत्त्वाचे म्हणजे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का, हे तपासून घ्यायचे आहे. आणि शेवटी नारीशक्तीचा प्रकार आणि कागदपत्रे जोडायची आहेत.
कागदपत्रे कोणती लागेल
- आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला. दाखला नसेल तर पिवळे, केशरी शिधापत्रिका
- रहिवासी प्रमाणपत्र – मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला
- बँक पासबुक