पाकिस्तानने संघात केला मोठा बदल

 

चूक दुरुस्त करून भारताविरुद्ध सामन्यासाठी सज्ज

अवघ्या जगाचे लक्ष ज्या सामन्याकडे लागले होते तो क्षण अगदी काही तासांवर येऊन ठेपला आहे. आज रविवारी रात्री आठ वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा थरार रंगेल. न्यूयॉर्कच्या नासाऊ आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने असतील. शेजाऱ्यांना आपल्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताविरूद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानने संघात बदल केला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कस्टर्न यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. अष्टपैलू इमाद वसीम भारताविरूद्ध खेळण्यासाठी सज्ज आहे.

खरे तर लठ्ठपणा आणि फिटनेसमुळे ट्रोल होत असलेल्या आझम खानला भारताविरूद्धच्या सामन्यात संधी मिळणार नसल्याचे कळते. पाकिस्तानातील वृत्तवाहिनी ‘जिओ न्यूज’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भारताविरूद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानी संघात एक बदल केला जाणार आहे. अष्टपैलू इमाद वसीमची प्लेइंग इलेव्हनमध्ये वर्णी लागली असून, आझम खान बाकावर असेल. ट्रोलिंग आणि सततच्या खराब फॉर्ममुळे आझम तणावात आहे. सराव सत्रातही त्याने सक्रिय सहभाग नोंदवला नाही.
आझम खानला डच्चू मिळण्याची शक्यता

पाकिस्तानचे प्रशिक्षक गॅरी कस्टर्न यांनी सांगितले की, इमाद वसीम भारताविरूद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल. पहिल्या सामन्यातील पराभवामुळे आम्ही निराश आहोत. आझम खानला संघात जागा नाही पण तरीदेखील तो संघाचा एक हिस्सा आहे. तो क्षेत्ररक्षणातही चुका करत असून, फलंदाजीतही त्याला काही खास करता आले नाही. एकूणच कस्टर्न यांनी देखील आझम खानला संघातून वगळणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

पाकिस्तानचा विश्वचषकासाठी संघ –
बाबर आझम (कर्णधार), अब्रार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वासीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शाबाद खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.

पाकिस्तानचे पुढील सामने –
९ जून – पाकिस्तान विरूद्ध भारत, न्यूयॉर्क
११ जून – पाकिस्तान विरूद्ध कॅनडा, न्यूयॉर्क
१६ जून – पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड, लॉदरहील