एक दोन दिवसात उर्वरित महाराष्ट्र व्यापणार
नैऋत्य मॉन्सूनची धडक पुणे, धाराशिव, लातूर, नांदेडपर्यंत पोचली असून, एक-दोन दिवसांत मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र तो व्यापणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान, राज्यामध्ये काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.दोन दिवसांपूर्वी मॉन्सून दक्षिण कोकण आणि बारामतीपर्यंत पोचला होता. त्यानंतर शनिवारी (दि.८) माॅन्सूनने विश्रांती घेत आपला मुक्काम तिथेच ठोकला. त्यानंतर रविवारी पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड भागात मजल मारली. पुढील दोन दिवसांमध्ये मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये मॉन्सून जाईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पुढील २४ तासांत मोसमी वारे पुणे, मुंबई शहरात दाखल होईल, असा अंदाज होता. मात्र हवेचा दाब अनुकूल नसल्याने ते अडखळत पुढे जात आहे. महाराष्ट्र ते अग्नेय अरबी समुद्रापर्यंत द्रोणीय रेषा तयार झाली आहे. त्यामुळे राज्यातील हवेचा दाब ९ जूनपासून अनुकूल होत आहे. या स्थितीमुळे आगामी २४ तासांत पुणे, तर पुढच्या ४८ तासांत ते मुंबईत येण्याची शक्यता आहे. केरळ, तामिळनाडू भागात अतिवृष्टी सुरू झाली आहे. त्याचा परिणाम राज्यात दिसणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही ९ ते १३ जून दरम्यान मुसळधार ते अतिवृष्टी असा पाऊस होण्याचा अंदाज आहे.