काटोलमध्ये धक्कादायक घडामोड; अनिल देशमुखांची माघार, मुलगा सलील लढणार!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काल ७ उमेदवारांची आपली चौथी यादी जाहीर केली. त्यात पक्षाने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जागी त्यांचे सुपुत्र सलील देशमुख यांना काटोल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, शरद पवार गटाने २४ ऑक्टोबर रोजी आपल्या ४५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे २६ ऑक्टोबर रोजी पक्षाने आणखी २२ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी ९, तर आज २८ ऑक्टोबर रोजी पक्षाने आणखी ७ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यासह शरद पवार गटाने आतापर्यंत ८३ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

अनिल देशमुखांनी यंदाच्या निवडणुकीतून माघार घेतली!

राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी यंदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनिल देशमुख यांना काटोल मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अनिल देशमुख यांनी आपण उमेदवारी अर्ज भरणार नसून यंदा मुलगा सलीलला उमेदवारी मिळावी, यासाठी पक्षनेतृत्वाकडे विनंती करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सलील देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरल्याचे दिसून आले.

अनिल देशमुखांचे गंभीर आरोप काय?

मी काटोलमधून उमेदवारी फॉर्म भरला नाही, कारण त्यांनी (सत्ताधारी) नियोजन केले होते की अनिल देशमुख यांनी फॉर्म भरला, तर काही तरी तांत्रिक अडचणी काढायची आणि तो फॉर्म रद्द करायचा. त्यासाठी दिल्लीतून मोठे वकील आणून ठेवले आहेत. जे रश्मी बर्वेसोबत झाले, तसेच माझ्यासोबत करण्याचा डाव होता, असा गंभीर आरोपच अनिल देशमुख यांनी केला. मी यंदा निवडणुकीसाठी पुन्हा उभा राहिलो असतो तर पुन्हा नवीन केसेस लावल्या असत्या. त्यामुळे मी उभे न राहता सलीलला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले. मी जरी उभा नसलो, तरी भविष्यात सरकार महाविकास आघाडीचेच येणार आहे, असा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे.

शालिनीताई पाटलानंतर साताऱ्यात तिसरी महिला!

अरुणादेवी या सातारा जिल्ह्यात शालीनीताई पाटील यांच्यानंतर तिसऱ्या महिला उमेदवार आहेत. यापूर्वी कल्पनाराजे भोसले सातारा मतदारसंघातून शिवसेनेकडून, तर शालिनीताई पाटील कोरेगावमधून राष्ट्रवादीकडून विधानसभा लढल्या होत्या.