कुडाळ : महायुतीच्या मेळाव्यात माजी खासदार निलेश राणे यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. आमच्यावर टीका करणारे आज मला मुख्यमंत्री करा म्हणत दारोदारी भटकत आहेत, मात्र यांचा चेहरा मित्रपक्षांना चालत नाही तो महाराष्ट्राला कसा चालेल असे मत एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
दरम्यान, कुडाळ हायस्कुलच्या मैदानावर बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी खासदार निलेश राणे यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमदार रविंद्र फाटक, आ.नितेश राणे, उद्योजक भैय्या सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, जिल्हा प्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक रूपेश पावसकर, महिला जिल्हाध्यक्षा वर्षा कुडाळकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी आदी शिवसेना भाजपा महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
२०१९ ला महायुतीला मतदान झाले होते. एकनाथ शिंदेने तेव्हा धाडस केले आणि राज्यात महायुतीचे सरकार आणले. आम्ही सरकारमध्ये होतो तरीही विरुद्ध दिशेने गेलो कारण बाळासाहेब ठाकरेंचे विचार ज्यांनी सोडले त्यांच्याबरोबर आम्ही राहिलो नाही. बाळासाहेबांच्या विचारांशी ज्याने बेईमानी केली त्याचा पराभव करण्यासाठी निलेश राणे शिवसेनेत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव करणाऱ्या काँग्रेससमोर ज्यानी गुडघे टेकले त्याचा पराभव करण्यासाठी निलेश राणे शिवसेनेत आले आहेत. तसेच, कोकणच्या विकासात ज्यांनी कायम खोडा घातला त्यांना धडा शिकवायचा आहे. हे विसरु नका, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
जो चेहरा मित्रपक्षांना चालत नाही तो महाराष्ट्राला कसा चालेल!
शिवसेना वाचवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मी उठाव केला आणि त्याला ५० आमदारांनी साथ दिली आजही ते सर्व आमदार माझ्यासोबत असल्याचा सार्थ अभिमान आहे. आमच्यावर टीका करणारे आज मला मुख्यमंत्री करा करा म्हणत दारोदारी भटकत आहेत, मात्र यांचा चेहरा मित्रपक्षांना चालत नाही तो महाराष्ट्राला कसा चालेल अशी खोचक टीका शिंदेंनी ठाकरेंवर केली. आम्ही शिवसेना सोडली नाही तर ती बरोबर नेली, धनुष्यबाण वाचवला. बाळासाहेब असताना सगळे लोक मातोश्रीवर यायचे. आज दिल्लीतल्या गल्ल्यांमध्ये फिरावे लागत आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
निलेश राणेंना ५२ हजार मताधिक्य मिळेल!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते निलेश राणे यांच्या हाती शिव धनुष्य व भगवा झेंडा देत शिवसेनेत जाहीर प्रवेश दिला. यावेळी उपस्थित शेकडो समर्थकांनी जोरदार घोषणा देत निलेश राणे यांच्या प्रवेशाला समर्थन दिले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, निलेश राणे यांच्या प्रवेशामुळे आजपासून महायुतीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. तसेच शिवसेना आणि महायुतीची ताकद वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे विजय झाले. त्या विजयात कुडाळ विधानसभा मतदारसंघातून २६ हजाराचे मताधिक्य होते. मात्र आता आजच्या उपस्थितीवरून निलेश राणे यांना या विधानसभा निवडणुकीत ५२ हजार मताधिक्य मिळेल याची मला गॅरंटी आहे.