नागपूर : महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत होणारा पराभव स्पष्ट दिसू लागल्याने मतदार यादीत घोळ केल्याचा आरोप पराभूत मानसिकतेमधून केला जात असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. एरव्ही ईव्हीएमवर बोलणारे मविआचे नेते आता मतदार यादीवर बोलू लागले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते नागपूरच्या कोराडी येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
दरम्यान, ठाकरे गटावर टीका करताना बावनकुळे म्हणाले, काँग्रेसच्या मांडीवर बसल्यापासून उबाठा नेते स्वत:चा सोडून काँग्रेसचाच अजेंडा राबवत आहेत. प्रशासनाच्या जागरूकतेने मतदार वाढल्यामुळे अंगाचा तिळपापड झालेला दिसतो. महायुतीकडून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र विरोधक मतदार यादीवरून ओरडा करत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यासाठी काँग्रेस नेते सुप्रीम कोर्टात गेले होते याचा उद्धव ठाकरे यांना विसर पडला असल्याचे ते म्हणाले.
मतदार याद्यांमध्ये सुधारणा!
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांची नावे मोठया संख्येने गहाळ झाल्याचे उघड झाले होते. महाराष्ट्रात अशा मतदारांची संख्या मोठी होती. ही नावे का गायब झाली? कशी गायब झाली? कुणाच्या आदेशाने गायब झाली? या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने माझ्या नेतृत्वात केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. तेव्हा मविआचे नेते का चुप्प होते? तेव्हा हा प्रश्न का उपस्थित केला नाही? असाही प्रश्न बावनकुळे यांनी विचारला. आता काँग्रेस घाबरली आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी आता अधिकाधिक मतदान करा, असे जनतेला आवाहन करणार असल्याचे देखील बावनकुळे म्हणाले.
नितीन गडकरींचे मार्गदर्शन!
देवेंद्र फडणवीस यांच्यासह मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यांनी काही जागांवरती आम्हाला मार्गदर्शन केले असून, गडकरी महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी पूर्णवेळ प्रचार करणार आहेत, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून उमेदवारी!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने अखेर आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह ९९ उमेदवारांची नावे आहेत. फडणवीसांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय, मागील निवडणुकीत तिकीट कापण्यात आलेले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे.