मुंबई : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपासाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत. महायुतीचा जागा वाटपाचा फार्म्युला जवळपास फायनल झाला आहे. पण महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबतची चर्चा गुरूवारपर्यंत सुरूच होती. अखेर त्यांचा देखील जागा वाटपाचा फार्म्युला ठरला आहे. महाविकास आघाडीमध्ये १००-८०-८० फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जागा वाटपाचा फायनल फॉर्म्युला ठरला आहे. आतापर्यंत २८८ जागांपैकी २६० जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. यामधील १०० जागा काँग्रेस पक्षाला तर उद्धव ठाकरे गटाला ८० आणि शरद पवार गटाला ८० जागा देण्यावर आघाडीतील नेत्यांनी शिक्कामोर्तब केला आहे.
उर्वरीत जागा मित्र पक्षांना सोडण्याचा निर्णय!
महाविकास आघाडीने उर्वरीत २८ जागा या मित्र पक्षांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या २८ जागांवर दोन पक्षांनी दावा केला आहे. हा २८ जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या जागांवर सध्या महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत हा तिढा देखील सुटेल आणि जागा वाटपाचा निर्णय जाहीर करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे. येत्या रविवारी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा निर्णय जाहीर केला जाईल, असे समजते.
शरद पवार काय म्हणाले?
आधी निकाल बघू, मग मुख्यमंत्री ठरवू. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत सध्या चर्चा सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत चर्चा करीत आहेत. आघाडीचा मुख्यमंत्री कोण असणार? हे आम्ही निकालानंतरच ठरवू, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कऱ्हाड येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.
दोन दिवसांत सर्व जागांची घोषणा!
आतापर्यंत झालेल्या जागा वाटपाची यादी काँग्रेस अध्यक्ष मलिक्कार्जुन खरगे, शरद पवार तसेच उद्धव ठाकरेंना पाठवली जाईल. आता उरलेल्या जागांचा तिढा हे वरिष्ठ नेते चर्चा करून सोडवतील. दोन दिवसांत सर्व जागांची घोषणा आम्ही करू, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
समाजवादी पार्टीची मागणी काय?
मविआतून समाजवादी पार्टीला १२ जागा मिळाल्या पाहिजेत अशी मागणी समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू असीम आझमी यांनी केली आहे. ते म्हणाले, काँग्रेसने समाजवादी पार्टीला विश्वासात घेतल्याशिवाय परस्पर आपल्या जागावाटपाची घोषणा करू नये. मतविभाजन टाळावे हीच आमची इच्छा आहे. हरयाणात मतविभाजनाचा फटका बसला नसता तर काँग्रेसला जिंकणे शक्य होते, याची आठवणही आझमी यांनी यावेळी करून दिली. दरम्यान, महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र समाजवादी पार्टीला सोबत घेणार की नाही? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.