मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) बिगुल अखेर वाजले आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर, २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे. काल निवडणूक आयोगाने याबाबत पत्रकार परिषद घेत घोषणा केली. यावरून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोठा दावा केला आहे.
दरम्यान, नवीन शासन निर्णय काढण्यासाठी आणि बोगस कामाचे भूमिपूजन करण्यासाठी ही निवडणूक लांबणीवर नेली का? असा प्रश्न आता विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
सरकारकडून फेक नरेटिव्ह पसरवण्याचे काम!
हे सरकार ३० टक्क्यांपर्यंत कमिशन घेत होते. मतदार यांना माफ करणार नाही. निवडणुकीत पैशाचा पाऊस पडेल. मात्र जनता बळी पडणार नाही. महाविकास आघाडीचे २२२ जागांवर एकमत झाले आहे. तसेच, दोन दिवसांनी पुन्हा बैठक होणार आहे. दिल्लीत उद्या स्क्रिनिंग कमिटीची बैठक आहे, त्यात निर्णय होईल. निवडणूक आधीच होणे अपेक्षित होते. मात्र, सरकार घाबरलेले होते. सरकारने लोकांना फसवणारे निर्णय घेतले. सरकारी पैशातून जाहिराती करुन त्यांनी फसवण्याचा प्रयत्न केला. आजची जाहिरात आम्ही पाहिली. त्यात तेलगंणातील योजना बंद असून सरकारने जाहिरात दिली. फेक नरेटिव्ह पसरवण्याचे काम केले गेले, असे वडेट्टीवार म्हणाले.
नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीला झटका बसणार
आज सात आमदारांचा शपथविधी झाला. कायदा गुंडाळून काम सुरु आहे. नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीला महाराष्ट्रातील निवडणूक झाल्यानंतर झटका बसेल. भाजपला संविधानाची आठवण राहुल गांधी यांनी करुन दिली. मोदींना डोक्याला संविधान लावावे लागतेय. आज आचारसंहिता लागणार त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील मुख्यमंत्र्यांचे नाव हटवले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची गरज आता संपली आहे, असा हल्लाबोल यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केला.
वार-प्रहार..
विधानसभा निवडणुकीतही संविधान हाच महाविकास आघाडीचा मुद्दा असेल आणि राज्यात महाविकास आघाडी जिंकल्यास नरेंद्र मोदींच्या खुर्चीला झटके बसतील असे भाकित विजय वडेट्टीवारांनी केले. तसेच, निवडणुकीची घोषणा होताच शंखनाद अशी पोस्ट करत देवेंद्र फडणवीसांनीही रणशिंग फुंकल्याची घोषणा केलीय. त्यानंतर काहीच वेळात त्यांनी २३ नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू या असे म्हणत दुसरी पोस्ट केली.