मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) झालेल्या जोरदार राजकीय संघर्षानंतर संपूर्ण राज्याला आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election) वेध लागले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार? आणि आचारसंहिता कधीपासून लागेल? याबाबत सध्या चर्चा सुरु आहेत. कारण आधीच लांबलेली विधानसभा निवडणूक कधी लागतेय याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. अशातच, आचारसंहिता कधीपासून लागू होईल? यासंदर्भात माहिती समोर आली आहे. येत्या दोन दिवसाच्या आत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. मंत्रालयात हालचाली गतीमान झाल्या असून सुट्टीच्या दिवशीही मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. रविवारी सुट्टी असतानाही सामाजिक न्याय विभागाचे सात शासन निर्णय जारी करण्यात आले आहे. आज सकाळीच ९:३० वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आहे. महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतले जाणार आहेत.
कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते!
आगामी विधानसभा निवडणूक ही अटीतटीची असणार आहे. महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीने ही चांगलीच कंबर कसलीय. त्यामुळे थेट लोकांशी संबंधित असलेल्या योजना सुरु करण्याचा धडाका महायुती सरकारने लावलाय. मात्र कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. म्हणून मागील आठवड्यात दोन दोन मंत्रीमंडळ बैठका झाल्याचे पाहायला मिळाले असून सध्या मंत्रिमंडळ बैठकीत अधिक निर्णय घेतले जात आहेत.
महाराष्ट्रात किती टप्प्यात होणार मतदान?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. याच दरम्यान निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात एक किंवा दोन टप्प्यात मतदान होऊ शकते. मात्र एकाच टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता अधिक असल्याचेही सांगण्यात आले आहे.
महिन्याभरात मंत्रिमंडळ किती वेळा बैठका?
२३ सप्टेंबर : २४ निर्णय
३० सप्टेंबर : ३८ निर्णय
४ ऑक्टोबर : ३२ निर्णय
१० ऑक्टोबर : ३८ निर्णय