भीषण अपघात: लाडक्या बहिणींची बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली; रायगडमधील धक्कादायक घटना!

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे लाडकी बहीण योजना कार्यक्रमासाठी जाणाऱ्या महिलांच्या बसला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. २९ महिलांना घेऊन जाणारी बस २० फूट खोल दरीत कोसळली असल्याची प्रथम माहिती मिळाली आहे.

दरम्यान, या बस अपघातात आठ महिला जखमी झाल्या आहेत. तसेच एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. स्थानिक प्रशासन व पोलिसांनी बसमधील महिलांना वाचवण्यासाठी बचाव मोहीम हाती घेतली आहे. बसमधून बाहेर काढलेल्या महिलांना जवळच्या रुग्णालयात देखील नेले जात आहे.

लाडकी बहीण योजनेच्या सोहळ्यासाठी माणगावला..

माणगाव तालुक्यातील मांजरोने घाटात हा अपघात झाला असून या अपघातात ८ महिला जखमी झाल्या असून एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. रानवडे कोंड येथून २९ महिला लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी माणगावला निघाल्या होत्या. मांजरोने घाटात येताच चालकाचे नियंत्रण सुटले व बस खोल दरीत कोसळली. यामध्ये जखमी महिलांवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोणीतीही जीवीतहानी नाही !

सुदैवाने या अपघातामध्ये कोणीतीही जीवीतहानी झालेली नाही. एसटी घेऊन गेलेले चालक हे नवीन असल्याने मुख्य वळणावरिल हा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

बहिणींना आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या हजारो बसेस!

माणगावमधील धनसे क्रीडांगणावर मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी लाडक्या बहिणींना गावागावांतून आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या हजारो बसेस सोडल्या आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील रानवडे कोंड येथून काही महिलांना घेऊन येत असतानाच माणगावकडे हा अपघात झाला असल्याचे समजते. दरम्यान, ५० हजार नागरिकांची बसण्याची आसन व्यवस्था होईल एवढी तयारी या मैदानात करण्यात आली आहे. १० एकरच्या भव्य जागेवर हा कार्यक्रम आयोजित केला असून कार्यक्रमासाठी ५०० पोलिस तैनात करण्यात आलेले आहेत.

नोव्हेंबर महिन्याचा हफ्ताही या महिन्यातच!

राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून अनेक महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा हफ्ताही या महिन्यातच जमा झाला आहे. या योजनेचा सरकारकडूनही जोरदार प्रचार होत असून अनेक जिल्ह्यात वचनपूर्ती मेळावे भरवले जात आहेत. वचनपूर्ती सोहळ्याचा तिसऱ्या टप्प्यातील शुभारंभ आज रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात होत आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.