नागपूर : नागपूरमधील एक धक्कादायक (Nagpur Crime News) घटना समोर आली आहे. नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ७ वर दोघांची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण नागपूर रेल्वे स्थानक हादरले असून सध्या सर्वत्र खळबळ माजली आहे.
दरम्यान, सदर आरोपी रेल्वे स्थानकावर लोकांना मारत सुटला होता. रेल्वेच्या रुळात उपयोगात येणाऱ्या लाकडी राफ्टरने वार करत त्याने दोन जणांची हत्या केली. तर बाकी तिघे गंभीर जखमी झाले असल्याचे समजते.
नेमके झाले काय?
नागपूर रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक ७ वर प्रवाशी रेल्वेची वाट पाहत होते. याचवेळी अचानक एका मनोरुग्णाने लाकडी राफ्टरने प्रवाशांवर हल्ला केला. सुरुवातीला काय झाले हे कुणालाच कळाले नाही. मात्र हल्ल्यात दोन प्रवासी ठार झाले. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा संशयित आरोपी फलाटावर आकस्मिक लोकांना मारत सुटल्याने प्रवासी देखील पळत सुटले. गणेश कुमार डी (वय ५४, दिंडीगुल तामिळनाडू) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. दुसऱ्या मृतकाची अद्याप ओळख पटलेली नाही. संशयिताने निर्घृणपणे हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, कर्मचाऱ्यांनी लगेच रेल्वे रुळावर पाठलाग करून या व्यक्तीला पकडले व पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. हा प्रकार प्रथमच घडल्याने पोलीसही चक्रावले आहेत. कॉटन मार्केट बाजूने रेल्वे स्थानकावर भिकारी, असामाजिक तत्वांचा वाढता वावर रोखण्याचे आव्हान आता जीआरपी, शहर पोलिसांपुढे आहे.
सुरक्षिततेचा प्रश्न एरणीवर!
हा प्रकार अचानक घडल्याने कुणाला सावरण्याचा वेळच मिळाला नाही. तो मनोरुग्ण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्य रेल्वे स्थानकावरच्या फलाट क्रमांक ७ वर पहाटे ३.३० वाजता ही घटना घडली. संशयित आरोपीस गजाआड करण्यात आले असले तरी त्याने हे कृत्य का केले? यामागचे गुपित कायम आहे. यामुळे रात्रीच्या वेळी गाड्यांच्या प्रतीक्षेत बसणाऱ्या, फलाटावर झोपलेल्या प्रवाशांचा व पर्यायाने रेल्वे स्थानकावरील सुरक्षिततेचा प्रश्न आता एरणीवर आला आहे.