मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणजे एसटी. गावागावात आणि खेड्यापाड्यात लाल परी धावते. त्यामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांना प्रवासासाठी एक साधन आहे. आता लालपरी आणखी वेगाने धावणार आहे. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यात २५०० नव्या डिझेल लालपरी बस पुढच्या वर्षी दाखल होणार आहेत, असे समजते.
दरम्यान, एसटी महामंडळाची अलीकडेच ३०४ बैठक पार पडली. या बैठकीत ७० हून अधिक विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली आहे. एसटीच्या ताफ्यात स्वमालकीच्या आणखी २५०० डिझेल बस घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. त्यानुसार महामंडळ येत्या काही दिवसांत निविदा प्रक्रिया राबविणार असून, पुढच्या वर्षी नव्या गाड्या दाखल होतील, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी एसटीचा ताफा!
एसटीला नेहमी फायद्यात ठेवण्यासाठी जुनी येणी वसूल करण्यावर भर दिला जात आहे. या माध्यमातून आतापर्यंत सुमारे २०० कोटी वसूल करण्यात आले आहेत. पुढील सहामाहीतही तेवढेच उत्पन्न अपेक्षित आहे, अशी माहिती डॉ. माधव कुसेकर यांनी दिली आहे. सध्या एसटीच्या ताफ्यात १४,००० बसगाड्या आहेत. त्यापैकी ५००० गाड्या एलएनजीमध्ये आणि १००० गाड्या सीएनजीमध्ये रुपांतरीत करण्यात येत आहे. प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी एसटीचा ताफा आणखी वाढविण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
नफ्याचे लक्ष्य!
शाळकरी मुलांना पासची माहिती देणे, प्रवासी संख्या जास्त असलेल्या मार्गावर अधिक गाड्या सुरू करणे, डिझेल आणि देखभालीबाबत चालकांचे प्रबोधन करणे, नवीन गाड्यांच्या माध्यमातून प्रवासाचा दर्जा सुधारणे अशा अनेक उपाय योजनांच्या माध्यमातून महामंडळ नफ्यात कसे राहील, यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, असेही कुसेकर यांनी सांगितले.
बस स्थानकांवर महिला बचत गटांना स्टॉल उघडण्यास जागा!
एस. टी. महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन 10X10 आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.