रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; केंद्राने केला दिवाळी आधीच बोनस जाहीर, मिळणार ‘इतकी’ रक्कम!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) सरकारने सणासुदीच्या काळात भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. गुरुवारी (३ ऑक्टोबर) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी बोनस मंजूर करण्यात आलेला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे. रेल्वे मंत्रालयाने यंदा आपल्या कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस देण्याची घोषणा केली असल्याचे समजते.

दरम्यान, रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाचा फायदा ११,७२,२४० रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ७८ दिवसांचा बोनस जाहीर करताना केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, एकूण ७६ दिवसांचा बोनस कर्मचाऱ्यांना प्रोडक्टिविटीच्या आधारे द्यायचा होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ७८ दिवसांचा बोनस मंजूर करण्यात आला.

एकूण ११ लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस!

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, एकूण ११ लाखांपेक्षा अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस म्हणून एकूण २०२९ कोटी रुपये दिले जातील. हा कर्मचाऱ्यांना दिला जाणारा प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस (PLB) असणार आहे. तसेच, रेल्वे कर्मचाऱ्यांशी संबंधित आकड्यांबद्दल माहिती देताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण १,१९,९५२ लोक रेल्वेत रुजू झाले. याशिवाय, सध्या ५८,६४२ कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, ३१ मार्च २०२४ पर्यंत एकूण रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या १३,१४,९९२ इतकी आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

या श्रेणीतील कर्मचाऱ्यांना बोनस!

२०२९ कोटी रुपयांचा हा निधी ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्टर, सुपरवायझर, टेक्निशियन, टेक्निशियन हेल्पर, पॉइंट्समन, मंत्रालयीन कर्मचारी आणि इतर गट ‘क’ कर्मचारी अशा विविध श्रेणीतील रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे या वर्षीही कर्मचाऱ्यांना दुर्गापूजा/दसऱ्याच्या सुट्ट्यांमधून बोनस दिला जाईल, असे रेल्वे मंत्रालयाने सांगितले. तसेच, रेल्वे कर्मचाऱ्याला ७८ दिवसांसाठी जास्तीत जास्त बोनसची रक्कम १७,९५१ रुपये आहे, असे देखील मंत्रालयाने सांगितले.

दसऱ्याआधीच बोनस!

पीएलबीसाठी पात्र असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून दिली जाणारी ही रक्कम दरवर्षी दुर्गापूजा/दसऱ्याच्या सुट्टीपूर्वी वितरीत केली जाते. यावर्षीही सुमारे ११ लाख ७२ हजारांहून अधिक अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या पगारा इतकी रक्कम पीएलबी म्हणून दिली जाणार.