नरखेड (नागपूर) : नागपुरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चौघे जण राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आले आहेत. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोवाड गावात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून मृतकांमध्ये पती, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. चौघांनीही सामूहिक आत्महत्या केली असल्याचे समजते.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पती, पत्नी आणि दोन मुलांनी मिळून सामूहिक आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या चौघांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले आणि या आत्महत्येमागचे नेमके कारण काय? याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही.
नेमके झाले काय?
मोवाड गावात राहणारे विजय पचोरी (६२ वर्षीय) त्यांची पत्नी मालाबाई पचोरी (५४ वर्षे), मुलगा डिंकू पचोरी (४० वर्षे) आणि गणेश पचोरी (वय ३७ वर्षे) हे चौघेही मृतावस्थेत आढळून आले आहेत. विजय पचोरी हे सेवानिवृत्त शिक्षक होते. दरम्यान, मृतकांपैकी तिघांचे मृतदेह हे हात-पाय बांधलेल्या अवस्तेत आढळून आले आहेत तर एकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आळा आहे. यामुळेच ज्या व्यक्तीने गळफास घेतला त्या व्यक्तीने आधी तिघांचे हात-पाय बांधून त्यांना फाशी दिली असावी मग स्वत: गळफास घेतली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल!
एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आल्याने गावातच नाही तर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. तसेच ही बातमी सध्या वाऱ्यासारखी पसरली. या सर्वांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सकाळी ७:३० ला उघडकीस आली. त्यानंतर ग्रामस्थांनी घडलेल्या प्रकाराची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी घटनास्थळावरचा पंचनामा करुन चौघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. चौघांच्या ही आत्महत्ये मागे नेमके कारण काय? याबाबतचा पोलीस तपास करत आहेत. तसेच ही सामूहिक आत्महत्या आहे की, घातपात? याबाबतही पोलीस तपास करत असल्याचे समजते.