महाराष्ट्र : महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे १,५०० रुपये मिळावेत यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) चालू केली आहे. या योनजेसाठी राज्यभरातील लाखो महिलांनी अर्ज दाखल आहेत. आतापर्यंत लाखो महिलांना सरकारद्वारे या योजनेद्वारे सन्मान निधी देण्यात आला आहे. आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण २९ सप्टेंबर रोजी केले जाईल, असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले होते. त्यानुसार आज या योजनेतील पैशांचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे.
महिलांच्या खात्यात तिसऱ्या हफ्त्याचे १५०० रुपये!
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’तील महिलांना तिसऱ्या हफ्त्याचे १५०० रुपये मिळण्यास सुरुवात झालीय. रविवारी २९ सप्टेंबर रोजी राज्यातील या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांपैकी ३४ लाख ७४ हजार ११६ लाभार्थ्यांच्या खात्यात ५२१ कोटी रुपये जमा झाल्याची माहिती, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. दिनांक २५ सप्टेंबर रोजी ३४,३४,३८८ भगिनींना १५४५.४७ कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे.
अदिती तटकरे यांची माहिती काय?
राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी तिसऱ्या टप्प्यात नेमक्या किती महिलांच्या (Woman) खात्यात पैसे जमा झाले आहेत, याबाबतची अधिकृत माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून दिनांक २९ सप्टेंबर रोजी ३४,७४,११६ भगिनींना ५२१ कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे. उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे. ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हफ्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले आहेत”, अशी माहिती त्यांनी दिली.
महिलांनी अर्जातील चुका दुरुस्त करून पुन्हा अर्ज भरावा!
ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज (Application) केला होता, मात्र त्यांचा अर्ज स्वीकारला गेला नाही, किंवा अर्ज भरताना चुका केल्या होत्या त्या महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्याबरोबरच बँक खाते व आधार क्रमांक लिंक न केलेल्या महिलांनाही या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. या महिलांना अर्जातील चुका दुरुस्त करून पुन्हा एकदा अर्ज भरावा लागेल. बँक खाते आधार क्रमाकांशी लिंक करावे लागेल. त्याशिवाय या योजनेचे पैसे त्यांना मिळणार नाहीत. राज्य सरकारने महिलांना आवाहन केले आहे की लवकरात लवकर बँकेत जाऊन बँक खाते आधारशी लिंक करून घ्यावे. लाडकी बहीण योजनेसाठी सरकार अजूनही अर्ज स्वीकारत आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.