NAGPUR: कन्हान येथे ३ हजार एकरवर राज्यातील पहिली महिला एमआयडीसी; उदय सामंत यांची घोषणा!

नागपूर : राज्यातील पहिली महिला एमआयडीसी (MIDC) कन्हान येथे होणार आहे. यासंदर्भाची अधिसूचना आचारसंहितेपूर्वी काढण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत (Uday samant) यांनी केली.

दरम्यान, राज्यात गेल्या दोन वर्षांत झालेल्या औद्योगिक प्रगतीचा आढावा मांडण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यभरात ‘महाराष्ट्राची उद्योग भरारी’ हा संवादात्मक उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात शुक्रवारी नागपूरमधून झाली. रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉइंटला झालेल्या कार्यक्रमादरम्यान उद्योगमंत्री सामंत यांनी उद्योजकांशी संवाद साधला.

काय म्हणाले उदय सामंत?

सध्या महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात असून, याबाबतचा प्रचार देखील करण्यात येत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत उद्योगांच्या पळवापळवीचे फेक नॅरेटिव्ह मांडण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दोन वर्षांमध्ये महाराष्ट्राने गुजरात, कर्नाटकला मागे टाकत विदेशी गुंतवणुकीत पहिला क्रमांक गाठला आहे. गडचिरोलीसारख्या माओवादग्रस्त जिल्ह्यात ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. येत्या वर्षभरात हा जिल्हा माओवाद प्रभावित जिल्ह्याऐवजी उद्योगनगरी म्हणून उदयास येणार आहे. डावोस येथील सामंजस्य कराराच्या माध्यमातून ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येत आहे. सरकारचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, असे सामंत यांनी सांगितले. यासोबतच, नागपुरातील एमआयडीसीतील जागा आता संपलेली असून उद्योगांसाठी नवीन जागेची गरज आहे. त्यामुळे आमडी येथे ३ हजार एकरवर नवीन एमआयडीसी उभारण्यात येणार आहे, असेदेखील त्यांनी स्पष्टपणे जाहीर केले.

विदर्भातील टेरीफचे वीज दर लवकरच कमी केले जाईल!

महाराष्ट्रात वीज टेरीफ जास्त आहे. विदर्भातील टेरीफचे वीज दर कमी झाले नसेल तर ते लवकरच केले जाईल, असेही उदय सामंत यांनी सांगितले. दरम्यान, उद्योगासाठी जागा घेतली परंतु त्याचा उपयोगच केला नाही, अशा उद्योगांची जमीन शासन आपल्या ताब्यात परत घेत आहे. त्याची सुरुवात झाली असून आतापर्यंत अशा अनेकांची जागा शासनाने परत घेतल्याचेही सामंत यांनी सांगितले.