नागपूर : उपराजधानी नागपुरात काल (२८ सप्टेंबर) आगळावेगळ्या ऑक्सिजन बर्ड पार्कचे लोकार्पण झाले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin gadkari) यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून हे विशेष पार्क भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुढाकारातून नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर ऑक्सीजन बर्ड पार्क (Oxygen Bird Park) नावाने साकारण्यात आले आहे.
दरम्यान, एकूण १४.३२ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून जवळपास २० एकरमध्ये याला साकारण्यात आले आहे. याठिकाणी केवळ पक्ष्यांसाठी विशिष्ट आणि पक्ष्यांच्या आवडीच्या फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. या उद्यानाचे महत्त्व केवळ ऑक्सिजन (प्राणवायू) देणारा परिसर एवढेच नाही. तर पक्ष्यांच्या विविध प्रजातींसाठी हा परिसर आश्रयस्थान म्हणून उपयुक्त ठरणार आहे. विशेष म्हणजे येथे ८ हजार १०४ प्रकारच्या वनस्पतींसह ऑक्सिजन पार्क विकसित करण्यात आलेला आहे. या प्रकल्पात त्या भागातील नैसर्गिक तळ्यांनाही त्याच स्वरूपात समाविष्ट करून घेण्यात आले आहे.
वनस्पतींसह अनेक सुविधांनी सुसज्ज ऑक्सिजन पार्क!
या ऑक्सिजन बर्ड पार्क मध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी फूड कोर्ट, प्रसाधनगृहे, चालण्याचे मार्ग, जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅक, वॉचटॉवर, ॲम्फीथिएटर प्लॅटफॉर्म आणि मुलांसाठी विशेष क्रीडा क्षेत्र यासह विविध प्रकारच्या सुविधा आहेत. प्रवेशद्वारावर आकर्षक आर्किटेक्चरल डिझाईन आहे. विशेष म्हणजे हे उद्यान विविध प्रकारची फळे देणाऱ्या वनस्पतींनी समृद्ध आहे. जांभळे, आंबा, पेरू, बेल, चिंच, अंजीर, खिरणी, पिंपळ, सीताफळ, आवळा ही झाडे फक्त पक्ष्यांसाठी या उद्यानात लावण्यात आली आहे. नागपूर-वर्धा मार्गावरील जामठा क्लोव्हर लिफ येथे हे ऑक्सीजन पार्क साकारण्यात आले आहे.
पार्कच्या लोकार्पणाला यांची प्रमुख उपस्थिती!
या पार्कचे काल लोकार्पण झाले असून या कार्यक्रमाला रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार प्रवीण दटके, आमदार अभिजित वंजारी, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर अडबाले, आमदार कृपाल तुमाने, आमदार अनिल देशमुख, आमदार नितीन राऊत, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, आमदार विकास ठाकरे, आमदार समीर मेघे, आमदार आशीष जयस्वाल, आमदार टेकचंद सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.