अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यासाठी २३७ कोटींच्या निधी वितरणास मंजुरी! 

मुंबई : राज्यात जून, २०२४ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी निधी वितरीत करण्यास आता मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला असून, २३७ कोटी ७ लाख एवढा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे समजते.

दरम्यान, मदत, पूनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले की, जून ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबत संबधित विभागीय आयुक्त यांच्या कडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले होते त्यानुसार शेतीपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

असे केले जाईल मदतीचे वितरण!

यामध्ये गडचिरोली जिल्ह्यासाठी ५७७२.४२ लाख, वर्धा जिल्ह्यासाठी ३६९१.७६ लाख, चंद्रपूर जिल्ह्यासाठी ७४२९.२२ लाख, नागपूर जिल्ह्यासाठी १८३६.५६ लाख, पुणे जिल्ह्यासाठी ४५८.७१ लाख, सातारा जिल्ह्यासाठी ८४.८६ लाख, सांगली जिल्ह्यासाठी १५१.१५ लाख, आंबोळी जिल्ह्यासाठी १५१.१५ लाख. अकोला जिल्ह्यासाठी १२९०.७० लाख, यवतमाळ जिल्ह्यासाठी ५४७.९६ लाख, बुलढाणा जिल्ह्यासाठी १३५८.६६ लाख आणि वाशिम जिल्ह्यासाठी ७२.५५ लाख असा एकूण २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

अनिल पाटील काय म्हणाले?

राज्यात अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. केंद्र शासनाने विहित केलेल्या नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त राज्य शासनाने अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले असून सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित केली असल्याची माहिती पाटील यांनी दिली.