Assembly Election: आगामी निवडणुकीसाठी महायुतीतील ८०% जागावाटप निश्चित; भाजपच सर्वाधिक जागा लढविणार!

नागपूर : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Vidhansabha Election 2024)वारे वाहत आहे. येत्या १५ दिवसात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. अशातच, निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली असून अनेक नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. महायुती व महाविकास आघाडीतच विधानसभेचा थेट सामना होणार आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरू आहे. काही जागांवर संघर्षाची स्थिती असल्याचे सांगितले जात असतानाच आता महायुतीत जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे समजते. महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, लोकसभेत जागावाटपाला विलंब झाल्याने महायुतीला चांगलाच फटका बसला होता. त्यामुळे विधानसभेला खबरदारी म्हणून महायुतीने जागावाटपात आघाडी घेत विद्यमान आमदारांचे तिकीट पक्के करत अन्य जागांवरही उमेदवार निश्चित केले आहेत.

भाजपच सर्वाधिक जागा लढविणार !

काही जागांवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या चर्चेनुसार भाजपच सर्वाधिक जागा लढविणार असल्याची माहिती मिळाली आहे. २०१९ प्रमाणेच भाजपकडून जवळपास १६० जागा लढविण्याचा आग्रह धरण्यात येत असून त्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे. यासोबतच, संभाव्य उमेदवारांना तिकीट देखील मिळू शकते अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यात जागावाटपाचा फॉर्ल्युला फायनल?

महायुतीतील घटक पक्षांमध्ये अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी महायुतीतील नेते प्रयत्नशील आहेत. पुढील आठवड्यात गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात जागावाटपाचा फॉर्ल्युला फायनल होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने १०० ते ८० जागांची मागणी केली आहे. तर, अजित पवार गटाला विद्यमान आमदार संख्येच्या १० ते २० जागा अधिक मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राज्यात नवीन सरकार २८ नोव्हेंबरच्या आधीस्थापन होणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणुकीचे सर्व टप्पे हे १० ते २० नोव्हेंबरदरम्यान होतील. यावेळी निवडणूक जाहीर झाल्यावर लगेच उमेदवारांची नावे जाहीर करण्यावर भाजपचा भर राहणार आहे. दसऱ्याच्या आधीच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

विधानसभेसाठी भाजपने १६० जागा लढल्या पाहिजेत अशी मागणी!

भाजपने केलेल्या सर्व्हेत ५० जागांवर उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. भाजप ‘एक नेता, एक जिल्हा’ धोरणाअंतर्गत प्रत्येक नेत्याला एका जिल्ह्याची जबाबदारी देणार आणि त्यानुसार निवडणूक रणनीती ठरणार. तसेच, ग्राउंड झिरोवर काम करत रिझल्ट मिळवणार. भाजप पदाधिकारी आणि नेत्यांनी अमित शाहांच्या बैठकीत विधानसभेला भाजपने १६० जागा लढल्या पाहिजेत अशी मागणी केलीय. २८८ जागांपैकी भाजपने १६० जागा लढवल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाश शिंदेच्या शिवसेनेला प्रत्येकी ६४ जागांवर निवडणूक लढवावी लागू शकते.