मेळघाटमध्ये धावत्या बसला आग; पाण्याविना पोहचले अग्निशमन दल, २५ प्रवाशी सुखरूप!

अमरावती : नेर आगाराची यवतमाळ-चिखलदरा बस मेळघाटात मोथा गावाजवळ जळून खाक झाली. बसमध्ये २५ प्रवासी होते. ही घटना बुधवारी (दि. १८) रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान घडली. चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे सर्व प्रवासी सुखरूप असून कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले, मात्र त्यामध्ये पाणीच नसल्याचे लक्षात येताच एकच खळबळ उडाली. त्यामुळे चिखलदरा येथून पाण्याचा खासगी टँकर मागविण्यात आला. तसेच मोथा गावातूनही नागरिकांनी टँकरमधून पाणी आणून बसला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजते.

नेमके झाले काय?

नेर आगाराची बस क्रमांक एम.एच ४० ए क्यू ६१६९ ही यवतमाळ वरून चिखलदरा येथे जात होती. मोथा गावाजवळ घाट वळणावर बसच्या इंजिनने अचानक पेट घेतला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने वाहकाला सुचित करत सर्व प्रवाशांना तत्काळ बस मधून खाली उतरवले. या घटनेनंतर संपूर्ण बस जळून खाक झाली. बसमधील २५ प्रवाशांपैकी काहीजण स्थानिक मोथा गावातील रहिवासी होते. त्यामुळे त्यांनी या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी चिखलदरा अग्निशमन दलाला या संदर्भात कळविले. अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले, मात्र त्यामध्ये पाणीच नसल्याचे लक्षात येताच एकच खळबळ उडाली. त्यामुळे चिखलदरा येथून पाण्याचा खासगी टँकर मागविण्यात आला. तसेच मोथा गावातूनही नागरिकांनी टँकरमधून पाणी आणून बसला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी देखील बस संपूर्णतः जळून खाक झाली.

गंभीर प्रकाराची होणार चौकशी!

पेटलेली एसटी बसची आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले. मात्र त्यामध्ये पाणी नसणे ही निश्चितच गंभीर बाब आहे. मी नुकताच पदभार स्वीकारला असून चिखलदरा इथल्या अग्निशमन अधिकाऱ्याचा पदभार हा अंजनगाव सुर्जी येथील व्यक्तीकडे आहे. मी त्यांना सकाळीच चिखलदरा इथे पोहोचण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल, त्याच्यावर निश्चितच कारवाई होईल, असे चिखलदरा नगरपरिषद मुख्याधिकारी विजय लोहोकरे यांनी सांगितले आहे.