मुंबई : महाराष्ट्रात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल. त्यानंतर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हटवण्याची सुरुवात होईल, असा दावा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंबंधी काँग्रेस नेत्यांची गुरुवारी मुंबई येथे एक बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परि्षदेतील गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील आदींसह सर्वच काँग्रेस नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
राहुल गांधींची लोकप्रियता अन् विश्वासार्हता वाढली!
रमेश चेन्नीथल यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मिळणाऱ्या धमक्यांवर भाष्य केले. व म्हणाले, राहुल गांधी अशा धमक्यांना भीकही घालत नाही. तसेच, राहुल गांधींनी सत्ताधारी पक्षाचा एक खासदार, एक आमदार व एका केंद्रीय मंत्र्याने दिलेल्या धमक्यांना गंभीरपणे घेण्याची गरज आहे. सध्या, राहुल गांधी यांची देशविदेशातील लोकप्रियता व विश्वासार्हता मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
मोदी सरकार हटवण्याची सुरुवात!
रमेश चेन्नीथला यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हटवण्याची सुरुवात महाराष्ट्रातून होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून लढेल. या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल. त्यानंतर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हटवण्याची सुरुवात होईल. दरम्यान, राहुल गांधी हे नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात लढणारे देशातील एकमेव नेते आहेत. त्यांनी भाजपपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळेच घाबरत असलेले भाजप व त्यांच्या मित्रपक्षांचे नेते सातत्याने राहुल गांधींना धमक्या देत आहेत, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील जनतेला हवा आहे बदल!
काँग्रेस नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनीही यावेळी भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर देशातील वातावरण बदलले आहे. भाजप सरकारमुळे लोकांचे जगणे अवघड झाले आहे. जनता त्रस्त आहे. जनतेला आता बदल हवा आहे. राज्यात सध्या काँग्रेसमय वातावरण आहे. त्यामुळे सर्वांनीच काँग्रेसचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले पाहिजे. महाविकास आघाडीचे सरकार आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.