देशभरातील मुलींना केंद्रस्थानी ठेवून भारत सरकारने सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) चालू केली होती. तसेच, भविष्यात मुलींच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली होती. मात्र आता केंद्रीय अर्थमंत्रालयाने (Finance Ministry) या योजनेशी संबंधीत अनेक नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्रालयाने या योजनेसंदर्भात नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केले असून यामध्ये नव्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, आता सुकन्या समृद्धी योजनेत मोठा बदल करण्यात आला असून, पोस्ट कार्यालयांना हे नियम त्वरीत लागू करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. त्यानुसार ही खाती बंद होणार असल्याचे समजते.
कोणते सुकन्या अकाऊंट बंद होणार?
केंद्रीय अर्थमंत्रालयाने जारी केलेल हे नवे नियम सर्व अल्प बचत खात्यावर लागू होणार आहेत. त्यामुळे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बँक खाते असणाऱ्यांनीही हे बदलेले नियम जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे. नव्या नियमानुसार आजी-आजोबांनी उघडलेले सुकन्या समृद्धी योजनेचे खाते आता आई-वडील किंवा कायदेशीर पालकांच्या नावाने ट्रान्सफर केले जातील. दोन सुकन्या समृद्घी अकाऊंट असतील तर त्यांना बंद केले जाईल. अशा सुकन्या अकाऊंट्सना नियमविरोधी मानले जाणार असल्याचे समजते.
आता पॅन आणि आधार कार्ड जोडणेही बंधनकारक!
अर्थ मंत्रालयानुसार मुलीचे आई-वडील किंवा कायदेशीर पालक असलेल्यांचे पॅन (PAN) आणि आधार कार्ड (Aadhaar) खात्याला जोडलेले असणे गरजेचे आहे. त्यामुळे आता पालकांनी पॅन आणि आधार जोडणीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी. सर्व पोस्ट ऑफिसने बदललेल्या या नियमांची माहिती लवकरात लवकर अकाऊंट होल्डर्सनाही देण्यात यावी, असे निर्देश अर्थ मंत्रालयाने दिले आहेत.
सुकन्या समृद्धी योजनेत मिळते ८.२ टक्के व्याज!
सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही प्रत्येक महिन्याला २५० रुपयांपासून ते वर्षभरात १.५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करू शकता. तसेच, सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जमा केलेल्या रकमेवर ८.२ टक्के व्याज दिले जात आहे. मुलगी २१ वर्षांची झाल्यानंतर सुकन्या समृद्धी योजनेतील खाते म्यॅच्यूअर होते. याच अकाऊंट अंतर्गत मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर ५० टक्के रक्कम काढता येते. या योजनेत अकाऊंट खोलण्यासाठी तुमच्याकडे मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र असणे गरेजेचे आहे.