मुंबई : राज्यातील सर्वच बँकेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची झुंबड पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाल्यानंतर महिलांची बँक खात्यातून पैसे काढण्याची लगबग सुरु आहे. या योजनेचा हप्ता मिळाल्याचा आनंद साजरा करताना काही महिलांच्या बँक खात्यातील पैसे बँकांनी कापण्यास सुरुवात केली असल्याचे समोर आले आहे आणि या प्रकरणामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्याचे चित्र सर्वत्र आहे.
दरम्यान, बँकांनी खात्यात किमान शिल्लक रक्कम नसल्याचे कारण देत पैसे कापले असून खात्यातील पैसे कापल्याने लाडक्या बहिणींच्या डोळ्यात पाणी आले आहे. या प्रकरणात बँकानी थेट राज्य सरकारच्या सूचना पायदळी तुडवल्याचे समोर आले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
सरकारने बहिणींच्या खात्यात पैसे टाकले. त्यानंतर बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या काही लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा आली. काही बँकांनी अनेक बहिणींचे पैसे कापले आहेत, आणि त्यानंतर बँकांनी बहिणींना वेगळेच उत्तर दिले की, तुमचे खाते बंद आहे, त्यामुळे पैसे कापण्यात आले. खात्यातील पैसे कापल्याने अनेक बहिणींची निराशा झाली. तसेच, खात्यातील पैसे न कापण्याच्या सूचना महिला आणि बाल विकास विभागाकडून बँकांना दिल्या होत्या, मात्र त्यानंतरही बँकांनी पैसे कापले आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा काय?
महिला व बालविकास विभागानेही याची गंभीर दखल घेतल्याची समजते. या बैठकीला महिला व बालविकास विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह इतर अनेक अधिकारी ही उपस्थित होते. लवकरच राज्यातील सर्व बँकाशी याबाबत पत्रव्यवहार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. लाभार्थी महिलांचे पैसे कापू नयेत, याबाबत बँकांना सूचना दिल्या जातील.
अद्यापही अर्ज प्रक्रिया सुरूच!
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ३१ ऑगस्ट होती. मात्र अजूनही अनेक महिला या योजनेअंतर्गत अर्ज करत आहेत. काही भागात महिलांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेकवेळा प्रयत्न करूनही अनेक महिलांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. याच सर्व अडचणी लक्षात घेता राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवली असल्याचे समजते.