तब्बल ५२.४६ % गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर!

मुंबई : राज्यात येणारे उद्योग, प्रकल्प परराज्यात जात आहेत. नव्या उद्योगधंद्यांसाठी गुजरात तसेच इतर राज्यांना विशेष प्राधान्य दिले जात आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय, अशातच आता विरोधकांच्या आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

दरम्यान, सत्ताधारी महायुतीकडून राज्यात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक झालेली आहे, असे सांगितले जातेय. तसेच, देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी तब्बल ५२.४६ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली असल्याचे देखील फडणवीस यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

२०२० आणि २०२१ साली महाराष्ट्र गुंतवणुकीमध्ये मागे गेला होता. मात्र २०१४ ते २०२१ यावेळी तो आम्ही पहिल्या क्रमांकावर ठेवला. त्यावेळी गुजरात आणि कर्नाटक पुढे गेले होते. ज्यावेळी सरकार आले त्यावेळी मी सांगितलेले की थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राला परत पहिल्या क्रमांकावर आणू. त्यानंतर २०२२-२०२३ मध्ये ते आम्ही पहिल्या क्रमांकावर आणले. मागच्या वर्षी देखील आपल्या नंतरची जी मोठी राज्य आहेत. गुजरात, कर्नाटक आणि दिल्ली यांच्या एकत्रित गुंतवणुकी पेक्षा जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रात आली होती. यावेळी तर आपण सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. ५२.४६% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. जे लोकं नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत होते. महाराष्ट्रातील उद्योग बाहेर चालले आहेत आणि याच आकड्यांने त्यांना पूर्ण उत्तर मिळाले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

गुंतवणूक केवळ कागदावर आहे?

महाराष्ट्रातून गुजरात व भाजपशासित राज्यात उद्योग गेले. महाराष्ट्रापेक्षा गुजरात पुढे गेला आहे. हे ते का सांगत नाहीत, अशी टीका विजय वडेट्टीवार (विरोधी पक्षनेते) यांनी केली होती. त्यांनाच प्रत्युत्तर देत देवेंद्र फडणवीस म्हणाले, वडेट्टीवार यांना गुजरातचे गुणगान गाण्यात अधिक रस दिसतो. आपले राज्य पहिल्या क्रमांकावर आल्यानंतरही त्यांना कौतुक नाही. हा महाराष्ट्रद्रोह नाही तर आणखी काय आहे? असे ते म्हणाले.