Political Post – At Post Marathi
राज्यातील विधानसभेची निवडणुक नोव्हेंबरच्या मध्यात होण्याची शक्यता आहे. सर्वच पक्ष राजकिय समीकरण जुळवण्यात व्यस्त आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघ सुरूवातीपासूनच चर्चेत दिसून येत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा हा मतदारसंघ आहे. देशमुख यांनी फडणवीस यांना उघड आव्हान दिल्याने आणि अजित पवारांसोबत जाण्यास इन्कार दिल्याने महायुतीचा डोळा काटोलवर आहे. महाविकास आघाडीकडून अनिल देशमुख लढण्याचे जवळपास निश्चित असले तरी महायुतीचा अजूनही ताळमेळ बसला नाही. अशात काटोल पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे हे सुद्धा निवडणुकीत रंगत आणणार असल्याची चर्चा आहे. माळी समाजावर डांगोरे यांची चांगली पकड आहे.
कोण आहेत संजय डांगोरे
संजय डांगोरे हे काटोल तालुक्यातील रिधोरा या गावचे आहेत. समाजिक क्षेत्रात त्यांचे चांगले नाव आहे. काटोल जिल्हा निर्मिती समितीचे ते मुख्य संयोजक आहेत. माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात अनेक वर्षांपासून काम करत आहेत. 2020 ला झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत संजय डांगोरे मोठ्या मतांनी निवडणूक आले. त्यानंतर 2022 साली काटोल पंचायत समितीच्या सभापती पदावर त्यांची निवड करण्यात आली. सभापती पदावरील कार्यकाळात काटोल तालुक्यातील प्रत्येक गावात जनसंपर्कावर त्यांनी भर दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्याच कार्यकाळात राज्यातील प्रथम क्रमांकाची पंचायत समिती म्हणून काटोल पंचायत समितीला पुरस्कार प्राप्त झाला आहे. दर शनिवारी दफ्तरमुक्त शाळा हा स्तुत्य उपक्रम त्यांच्या संकल्पनेतून काटोल तालुक्यात राबवण्यात येत आहे.
अनिल देशमुख यांच्याशी दुरावा का?
संजय डांगोरे हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादीच्या तिकीटीवर निवडूण येत त्यांना सभापती पद मिळाले. काटोल मतदारसंघात अनिल देशमुख आघाडीकडून लढणार असल्याचे निश्चित असले तरी संजय डांगोरे वेगळी भूमिका घेण्याच्या मानसिकतेत का आहे, अशी चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सभापती निवड प्रक्रियेत संजय डांगोरे यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला होता. पात्रता असूनही जातीय समीकरणांसाठी संजय डांगोरे यांचा बळी जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. रस्सीखेचीनंतर डांगोरे यांच्याच गळ्यात सभापती पदाची माळ पडली. तेव्हापासून डांगोरे आणि देशमुख यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात
अनिल देशमुख तुरूंगात असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशमुखांचे अनेक कार्यकर्ते गळाला लावले. बावनकुळेंनी त्यांना वेळोवेळी रसद पुरवली आहे. संजय डांगोरे नाराज असल्याची कुणकुण भाजपाला न लागेल तर नवलच. काही दिवसांपूर्वी बावनकुळे यांनी संजय डांगोरे यांची भेट घेतली. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील डांगोरे यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती आहे.
माळी समाज ठरणार गेमचेंजर
काटोल विधानसभेत कुणबी आणि माळी समाजाचे प्राबल्य आहे. या समाजाचा अनिल देशमुख यांना नेहमीच पाठिंबा मिळत आलेला आहे. संजय डांगोरे हे माळी समाजाचे आहेत. जवळपास 40 हजारांच्या वर माळी समाजाची लोकसंख्या मतदारसंघात आहे. काटोल आणि नरखेड तालुक्यातील माळी संघटनेत डांगोरे सक्रीय आहेत. दरवर्षी समाजाचा मेळावा भरतो. माळी समाजाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा ठराव यंदाच्या मेळाव्यात घेण्यात आला आहे. एकट्या माळी समाजाच्या पाठिंब्यावर निवडणूक जिंकता येत नसली तरी राजकिय समीकरण नक्कीच बदलू शकेल.
काटोलात दावेदारी कोणाची?
काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीकडून अनिल देशमुख यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. मात्र महायुतीत मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे. मागच्या 10 वर्षापासून भाजपाने संघटन तयार करून निवडणुकीची तयारी केली आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही काटोलवर दावा ठोकला आहे. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. जर जागा भाजपाला सुटली तरी उमेदवारांमध्ये देखील मोठी रस्सीखेच निर्माण होणार आहे. भाजपात इच्छुकांची गर्दी आहे. त्यामुळे महायुतीतील कार्यकर्त्यांत संभ्रम आहे. तर श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्यक्य जिचकार यांनी देखील कंबर कसली आहे. महायुतीचा उमेदवार कोण, यावरच काटोल विधानसभेचे राजकिय भविष्य अवलंबून आहे.